पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार गाेपीचंद पडळकर यांनी बारामतीच्या जिरायती भागातील पाण्याचा प्रश्न पुन्हा छेडला आहे. यामुळे एका बाजुला चकाचक समृध्दी अन् दुसऱ्या बाजुला दुष्काळाचा शाप हे बारामतीचे वास्तव पुन्हा एकदा समाेर आले आहे.
बारामती म्हणजे विकासाची गंगा हे चित्र राज्यात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या बारामतीला भेटी घडवून हे अधाेरेखितही केले जाते. परंतु, बारामतीपासूनच 15-20 किलाेमीटर अंतरापासूनच दुष्काळाच्या शापात जगणाऱ्या माणसांची दखल आतापर्यंत घेतलेली नाही. बारामती तालुक्याचे नीरा डावा कालव्याने दाेन भाग केले आहेत. एका बाजुला कालव्याच्या पाण्यावर बहरलेला सधन भाग आणि दुसऱ्या बाजुला पिण्याच्या पाण्यासाठीही टाचा घासावी लागणारी माणसे आहेत.
स्वातंत्र्यानंतर गेल्या 55 वर्षांपासून पवार कुटुंबियांचे बारामती तालुक्यावर वर्चस्व आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री यापासून अनेक पदे भाेगली. राज्यातील काॅंग्रेस आघाडीच्या सरकारचे तेच सर्वेसर्वाे हाेते. त्यानंतर अजित पवारही गेल्या तीस वर्षांपासून बारामती तालुक्याच्या जीवावर राज्याचे राजकारण करत आहेत. मात्र, तरीही बारामती तालुक्यातील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटला नाही.येथील लोकप्रतिनिधींकडून नेहमी चकाचक बारामतीचाच उदोउदो होत असला तरी जिरायती भागाला लागलेला दुष्काळाचा शाप कधी संपणार हा प्रश्न काेणी विचारत नाही. साठ वर्षांनंतरही तालुक्याच्या पश्चिम भागात कायम दुष्काळी परिस्थिती असते. लोकप्रतिनिधींकडून दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. हा सर्व भाग जिरायत समजला जातो. याठिकाणी नापिकी, जनावरांना चारा नसणे आणि पिण्यासाठी पाण्याचा अभाव असे एकत्रित संकट नेहमीच उभे असते. येथील नागरिकांना सिंचनासाठी नव्हे तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. बारामती तालुक्याचा पश्चिम भाग सोडून इतर सर्व तालुका नीरा डावा कालव्यामुळे सुजलाम-सुफलाम झाला. शेती आणि सहकाराच्या माध्यामतून अनेक संस्था, संघटना, दूध संघांचे जाळे उभे राहिले.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ सततच्या दुष्काळामुळे आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून बारा डिसेंबर २०१३ मध्ये पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलान केले होते. काही गावांत घरांवर काळे ध्वज लावून व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यानंतरही प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकांवेळी या भागातून मोठा विरोध केला जातो. महादेव जानकर भारतीय जनता पक्ष- रासपकडून लाेकसभा निवडणूक लढले त्यावेळी या भागाने त्यांना चांगला हात दिला हाेता. मात्र, त्यानंतर उलट येथील नागरिकांवर पवार कुटुंबियाने सूड उगविला असे प्रशासन केले.भावनेच्या राजकारणात पवार कुटुंबियांचे फावते असा येथील नागरिकांचा आराेप आहे. निवडणुकांपुरती आश्वासने दिली जातात. त्यानंतर वाऱ्यावर साेडले जाते, असे म्हटले जाते.
भारतीय जनता पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती लाेकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. भाजपचे अनेक नेते सध्या बारामती तालुक्यावर लक्ष ठेऊन आहेत. या माध्यमातून तरी आपल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी येथील नागरिकांची आशा आहे.
