राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके काय आरोप

बोगस कंपन्यांद्वारे साखर कारखाना चालवण्याचे कंत्राट घेऊन 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मुख्य आरोप सोमय्यांनी मुश्रीफांवर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे. मुश्रीफ यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तर अवघ्या कोल्हापुरातील कार्यकर्ते मुश्रीफ यांच्यासोबत उभे आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके काय आरोप आहेत हे पाहुयात

कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे.या कारखान्यातील 98 टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलाय.या घोटाळ्यात मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांचाही प्रमुख सहभाग आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी अवसायनात काढण्यात आला होता. हा कारखाना बिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला.विशेष म्हणजे बिस्क इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ यांचे जावाई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे. या व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली होती.
या बोगस खात्यांमध्ये टाकलेले पैसे मतीन मंगोली यांच्या बिस्क इंडिया कंपनीत वळते करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


बिस्क इंडिया कंपनीला त्यापूर्वी कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नाही, तरीही कंपनीला हा कारखाना हस्तांतरीत करण्यात आला, यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्य लिलाव केला नाही, असे आरोप करण्यात आले आहेत.कारखाना हस्तांतरीत करण्यासाठी केवळ बिस्क इंडिया कंपनीच कशी सापडली, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता. मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.याच घोटाळ्या प्रकरणी ईडीमार्फत आज छापेमारी सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी कशी प्रतिक्रिया उमटते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान हसन मुश्रीफ यांचे काऊंटडाऊन सुरु झालं आहे. हसन मियां यांच्यावर कारवाई होणार. हसन मुश्रीफ का एवढी घाई करत आहेत. पहिला नंबर अनिल परब, नंतर मुश्रीफ आणि मग अस्लम शेख यांचा लागणार आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.