काॅंग्रेसच्या फजितीचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले कारण..

मुंबई : काँग्रेसच्या नाराजी 23 नेत्यांमधील महाराष्ट्रातील प्रमुख शिलेदार असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा काॅंग्रेसच्या नेतृत्वावर हल्ला करत नाशिकमधील फजितीचे कारण सांगितले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसची फजिती झाली आहे. काँग्रेसमध्ये निवडणूक प्रक्रियेतून लोकं निवडले न गेल्यानं हा घोळ झाला आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी राहूल गांधी यांच्यावरही हल्लाबाेल केला आहे. चव्हाण म्हणाले, ‘केवळ यात्रेमुळे यश मिळणं अवघड आहे. निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर काँग्रेसची संघटना मजबूत केली पाहिजे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधींना सावरकरांवर बोलण्याची गरज नव्हती. काँग्रेस पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले होते. त्यात संघटनात्मक रचनेत बदल करण्यासोबत नव्या नेतृत्वाचा आग्रह धरला हाेता. नाशिकमध्ये काॅंग्रेस पक्षाची फजिती झाल्याचे सांगून पुन्हा एकदा हा मुद्दा चव्हाण यांनी चर्चेत आणला आहे.