भारत जाेडाे यात्रेतील लाॅंचींगच नाशिकमध्ये काॅंग्रेसच्या मुळावर

मुंबई : काॅंग्रेसच्या पक्षीय व्यवस्थेत घुसलेल्या घराणेशाहीमुळे यापुढील काळातही या पक्षाची काेंडीच हाेत राहणार हे सत्यजीत तांबे यांच्या बंडखाेरीमुळे स्पष्ट झाले आहे. मामा बाळासाहेब थाेरात यांचे राजकारण सांभाळत अभ्यासू नेता म्हणून ओळख मिळविलेल्या सत्यजीत तांबे यांना यापुढील काळातही पालखीचे भाेईच राहावे लागणार हाेते. कारण बाळासाहेब थाेरात यांनी कन्येचे भारत जाेडाे यात्रेत लाॅचींग केले हाेते. केवळ थाेरातच नव्हे तर अशाेक चव्हाण, विजय वडेट्टीवार यासारख्या काॅंंग्रेस नेत्यांपासून अनेकांनी भारत जाेडाे यात्रेमध्ये आपल्या मुला-मुलींचे लाॅचींग केले. हे लाॅंचींगच महाराष्ट्रातील काॅंग्रेसच्या मुळावर आलेय? असा प्रश्न या निमित्ताने चर्चीला जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते सत्यजीत तांबे हे काँग्रेस मधल्या घराणेशहीच्या समस्येचं प्रतीक आहे. कार्यकर्ते कायम कार्यकर्तेच राहावेत आणि आपलं घराणं कायम नेतेपदी राहावं हे सदासर्वकाळ चालत राहणार नाही, याची जाणीव काेठेतरी नेत्यांनी ठेवायला हवी. परंतु ती ठेवली नाही.

राहूल गांधी यांची भारत जाेडे यात्रा बुलढाणा जिल्ह्यात आली असताना एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून डॉ. जयश्री थोरात सहभागी होऊन खासदार गांधी यांच्यासोबत ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर संवाद साधल्याच्या बातम्या आल्या. आता प्रश्न असा उपस्थित हाेताे की डाॅ. जयश्री थाेरात खराेखरच महिलांच्या आराेग्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून सहभागी झाल्या हाेत्या की, बाळासाहेब थाेरात यांच्या कन्या म्हणून. थाेरात यांनी आपल्या कन्येच्या राजकीय प्रवेशाचे लाॅंचींग या निमित्ताने करून घेतले. याचाच अर्थ पुढच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थाेरात यांनी लढायचे नाही ठरविले तर उमेदवारी डाॅ. जयश्री यांनाच मिळणार हे स्पष्ट हाेते. या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांनी काय करायचे? हा प्रश्न हाेता. त्यामुळे पक्षाच्या विराेधात जाऊन बंडखाेरी करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थाेरात यांचे भाचे आहेत. त्यांना अशा पध्दतीने डावलले जात असेल तर इतर कार्यकर्त्यांची काय अवस्था हाेत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. काॅंग्रेसच्या राजवटीत पक्षीय राजकारण हे घराण्याची सद्दी बनले. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राजकारणाची एक पध्दत बनून गेली आहे. शक्य तितका काळ विधानसभा-लाेकसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवायची. काही काळानंतर मुलगा किंवा मुलींसाठी जागा तयार करायची. आपल्याच हयातीत त्यांचे राजकीय जीवन घडवायचे. पण त्याचवेळी या नेत्याच्या संपूर्ण राजकारणात निष्ठेने साथ देणाऱ्यांच्या पदरात कधीच काही पडत नाही. त्यांच्याकडे एखाद्या पदाचा तुकडा टाकला जाताे. हा तुकडा नाकारण्याची हिंमत काही जण दाखवितात. त्याचेच उदाहरण म्हणजे सत्यजीत तांबे यांची बंडखाेरी आहे, हे लक्षात घ्यायला हवे.