पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूक एकाच दिवशी आमदार गोपीचंद पडळकरांचं निवडूक आयोगाला पत्र

एकाच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा आणि पदवीधर निवडणूक आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. याच संदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आहे.

येत्या 30 जानेवारीला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, याच दिवशी विविध गटातील पदवीधरांच्या परीक्षा होणार आहेत. एकाच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूक आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळं तब्बल 10 हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. याच संदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आहे. या गंभीर मुद्द्याची दखल घेऊन, यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती पत्राद्वारे पडळकर यांनी केली आहे.

नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात एका जागेसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत.

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यात एकूण 34 उमेदवारांपैकी एकूण 33 उमेदवारांची उमेदवारी अर्ज वैध ठरले. गजानन नेहारे या एका उमेदवाराचे वय 30 पेक्षा कमी असल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले. 16 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.