विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर करूनही अर्ज न भरणारे सुधीर तांबे यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली असून पक्षाकडून चौकशी केली जाणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संमतीने पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली. मात्र, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाने सध्या तरी कारवाई केलेली नाही.
सुधीर तांबे म्हणाले, “मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला कारवाईबाबत समजलं. मात्र, या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही.”
पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने ही सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसने सुधीर तांबेंवरील निलंबनाच्या कारवाईचे पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष अर्ज भरायला मदत केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
