नाशिक पदवीधर निवडणुकीत क्षणाक्षणाला नवा ट्विस्ट अनुभवयास मिळत असून परवा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला. तर आज माघारीच्या दिवशी पाटील मात्र नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. एकीकडे माघारीसाठी अवघा एक तास शिल्लक असताना नाशिक पदवीधर मतदारसंघात चांगलाच पेच उभा राहिला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत पहिल्या दिवसांपासून ट्विस्ट पाहायला मिळत असून दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार तसेच धुळे येथील भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आणि नाशिक पदवीधर निवडणुकीत समीकरण बदलले. मात्र या समीकरणानंतर शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याने गोंधळ उडाला आहे. आज माघारीचा शेवटचा दिवस असून अवघा एक तास शिल्लक असताना अशा प्रकारे शुभांगी पाटील यांनी नॉट रिचेबल आल्याने नाशिक पदवीधर निवडणुकीत शेवटपर्यंत नेमकं काय घडणार आहे? हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.
मंत्री गिरीश महाजन हे कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. प्रत्येक उमेदवाराला माघार घेण्यासाठी महाजन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातील काही उमेदवारांनी माघारही घेतली आहे. मात्र, शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून भाजपनेही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच महाजन नाशिकमध्ये आले होते. सत्यजित तांबे यांची बिनविरोध निवड करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच शुभांगी पाटील या कुठे आहेत याची माहितीही ठाकरे गटाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
