21व्या शतकातील नेतृत्व अग्निवीरांच्या हाती : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तिन्ही दलातील प्राथमिक प्रशिक्षण सुरु करणार्‍या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या वेळी एकविसाव्या शतकात देशाचे नेतृत्व ‘अग्निवीर’च करतील, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भारतीय सैन्यदलांसाठी पथदर्शी ‘अग्निपथ’ योजनेच्या पहिल्या तुकडीतील ‘अग्निवीरां’चे अभिनंदन केले. “भारतीय सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यात आणि त्यांना भविष्यासाठी सज्ज करण्यात ही परिवर्तनकारी योजना परिणामकारक ठरेल,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “या युवा ‘अग्निवीरां’मुळे भारताचे सशस्त्र दल अधिक उत्साहपूर्ण आणि तंत्रज्ञानस्नेही होईल. ‘अग्निवीरां’च्या क्षमतेबद्दल दृढ विश्वास व्यक्त करून त्यांच्यातील ऊर्जा सशस्त्र दलांच्या शौर्याचे प्रतिबिंब आहे,” असे त्यांनी म्हटले.

“नवा भारत नव्या जोमाने भरलेला असून आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करून त्यांना ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,” असे पंतप्रधानांनी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘अग्निपथ योजना’ कशा प्रकारे लाभदायक आहे, याविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. महिला ‘अग्निवीर’ आपल्या कामगिरीने ज्या प्रकारे नौदलाची शान वाढवत आहेत, त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच आपण तिन्ही दलांमध्ये महिला ‘अग्निवीरां’ना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिक आणि आधुनिक लढाऊ विमाने चालवणार्‍या महिलांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी विविध आघाड्यांवर महिला सशस्त्र दलांनी कशाप्रकारे नेतृत्व केले आहे याची आठवण करून दिली.

विविध भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तैनात झाल्यानंतर ‘अग्निवीरां’ना समृद्ध अनुभवांची शिदोरी तर मिळेलच शिवाय त्यांना या संधीचा लाभ त्या प्रदेशातील भाषा शिकून घेण्यात आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेण्यात होईल, असे त्यांनी सांगितले. सांघिक कार्य आणि नेतृत्व कौशल्याचा सन्मान यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळेल, असे ते म्हणाले. ‘अग्निवीरां’ना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातले त्यांचे नैपुण्य अधिक वाढवण्यासाठी कार्य करत असताना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक राहण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

“एकविसाव्या शतकात युद्धाच्या स्वरूपात बदल होत आहेत. नव्याने उदयास येत असलेल्या संपर्करहित युद्धपद्धती आणि सायबर युद्धामधील आव्हाने पाहता तांत्रिकदृष्ट्या प्रगत सैनिक आपल्या सशस्त्र दलांमध्ये महत्वाची भूमिका बजावतील. देशातील युवावर्गाकडे तशी क्षमता आहे आणि म्हणूनच येणार्‍या काळात आपले ‘अग्निवीर’ सशस्त्र दलांमध्ये प्रमुख भूमिका बजावतील,” असे ते म्हणाले.