काॅंग्रेसमधील राजकारण, सत्यजितच्या खांद्यावरून बाळासाहेब थाेरात यांच्यावर बंदूक

मुंबई : काॅंग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणातूनच सत्यजित तांबे प्रकरण अत्यंत वाईट पध्दतीने हाताळले गेले. काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी सत्यजितच्या खांद्यावरून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थाेरात यांच्यावर बंदूक चालविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नाशिक विधान परिषद मतदारसंघात काॅंग्रेसचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांची आपला मुलगा सत्यजित याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा हाेती. महसूल मंत्री बाळासाहेब थाेरात यांचाही त्याला सुप्त पाठिंबा हाेता. परंतु, या निमित्ताने बाळासाहेब थाेरात यांना टार्गेट करण्याची खेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी केली. त्यामुळे सत्यजित यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यावरही सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फाॅर्म पाठविण्यात आला. सत्यजित काॅंग्रेसपासून दूर कसे जातील याचीच काळजी सगळ्या काॅंग्रेसच्या नेत्यांनी घेतली. सुरूवातीला सुधीर तांबे यांचे तात्पुरते निलंबन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्षांकडून हा निर्णय झाला. त्यानंतर प्रदेश पातळीवरून सत्यजित यांना सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या काळात बाळासाहेब थाेरात आघाडीत तिसऱ्या क्रमांकाचे तर काॅंग्रेसमध्ये पहिल्या क्रमांकाचे नेते बनले हाेते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेससाेबत हाेणाऱ्या बैठकांत काॅंग्रेसच्या बाजुने बाळासाहेब थाेरातच सहभागी हाेत. त्यामुळे काॅंग्रेसच्या काही नेत्यांचा थाेरात यांच्यावर राग हाेता. या राजकारणामुळे काॅंग्रेसचे सहानुभूतीदारही नाराज आहेत. त्यांच्या मते सत्यजितच्या खांद्यावरून बाळासाहेब थोरात यांच्यावर बंदूक चालवली. काँग्रेसमध्ये गेल्या चार-पाच वर्षात इतक्या चुका केल्यावर ही कोणत्याही नेत्यावर कारवाई झाली नाही. पण सत्यजित तांबेवर चौकशी न करता कारवाईची घाई का? इतर वेळी अहवाल मागवले जातात, यावेळी अहवाल का मागवला नाही?

काही राजकीय पत्रकारांच्या म्हणण्यानुसार नाशिक प्रकरणावरून काँग्रेस आमदारांमध्ये दोन थिअरी आहेत. पहिली म्हणजे बाळासाहेब थोरात यांनाच सत्यजित नकोय. आपल्या मुलीला लाँच केलं आहे, म्हणून त्यांनीच गेम केला. दुसऱ्या थिअरीनुसार ईडीच्या कारवाईला घाबरून थोरात यांनी सत्यजित ह्याला भाजप मध्ये पाठवलं, स्वतः सुरक्षित केलं.सत्यजित तांबेना आमदार व्हायचंय. त्यामुळे ते स्वतः भाजपला ॲप्रोच झाले. बाळासाहेब थोरातांनी सत्यजीतला न समजावता सेफ पॅसेज दिला, असेही म्हटले जात आहे.