आजाेबा शरद पवार यांच्याकडून कवडीचीही किंमत नसल्यानेच पार्थ पवार अस्वस्थ!

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष आणि आजाेबा शरद पवार यांच्याकडून काडीचीही किंमत दिली जात नसल्यानेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पार्थ पवार यांनी नुकतीच मंत्री शंभुराजे देसाई यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली. पार्थ पवार अस्वस्थ असल्याचेही बाेलले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते पार्थ पवार यांचा ज्या पध्दतीने राजकारणात प्रवेश झाला हेच शरद पवार यांना आवडले नव्हते. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये मावळ लाेकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे निवडणूक लढविली हाेती. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत बाेलताना पवार यांनी पार्थ यांना एखादा धक्का बसायला हवा असे मत व्यक्त केले हाेते.

महाविकास आघाडी सरकार अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अडचणीत आले हाेते. नेमक्या याच वेळी पार्थ यांनी सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर शरद पवार यांनी पार्थ यांचे चांगलेच कान उपटले हाेते. माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही ते इनमॅच्युअर आहेत, असे शरद पवार म्हणाले हाेते.

त्यानंतर पार्थ यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत त्यांनी राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या हाेत्या. मात्र, त्यापूर्वीच राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे आपल्या आजाेबांच्या वक्तव्यालाच पार्थ यांनी खाेडून काढले हाेते. त्यामुळेही शरद पवार संतप्त झाले हाेते.


मावळ लोकसभा मतदारसंघात लढताना पार्थ पवार पहिल्याच भाषणावेळी “क्लिन बोल्ड” झाले हाेते. त्यांची खिल्ली उडविली गेली हाेती. त्यावेळीही पवार कुटुंबियांनी पार्थ  यांना भाषणबाजी आणि मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला हाेता. एका बाजुला कुटुंबियांकडूनच पाठिंबा मिळत नसताना चुलत बंधु राेहित पवार मात्र सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत झाल्यानेही पार्थ पवार अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.