धनुष्यबाण कुणाचा? केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी

आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं यावर सुनावणी करणार आहे.यापूर्वी दोनदा सुनावणी झाली आहे. आज तिसऱ्यांदा सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोघांकडूनही पक्षाचं नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण यावर दावा सांगण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंगळवारी (17 जानेवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा केला होता. शिंदे गटाने दाखवलेलं चित्र काल्पनिक आहे, तसेच शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घेण्याची मागणी सिब्बल यांनी केली होती. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपद बेकायदा असल्याचा युक्तिवाद केला. शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्यामुळे शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचं जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितलं होतं.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

गेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी घटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत अशी बाजू मांडली होती. तर, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी त्याला आक्षेप घेतला होता. त्यावर आज सुनावणी होणार असून खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.