आजपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची आज घोषणा करण्यात येणार आहे. या युतीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला नवा पक्ष मिळणार आहे. परंतु राज्यातील समाजकारण आणि राजकारण बदलून जाणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या युतीच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.
दरम्यान शिवसेना-वंचित यांची युती कधी होणार? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनाही विचारण्यात आलं. शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा करत आहे. सर्वंनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दोघेही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करणार आहेत. यावेळी दोघेही युतीच्या किमान समान कार्यक्रमाची माहिती देणार असल्याचं सांगितलं जातं. तसेच जागा वाटपावरही हे दोन्ही नेते भाष्य करण्याची चिन्हे असल्याचं सांगितलं जातं. तसेच या युतीच्या घोषणेवेळी महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षाचे नेते नसतील अशी माहिती आहे.
