शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? अशी चर्चा रंगलेली असतानाच मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून या तैलचित्र अनावरण सोहळ्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंगच आहे, असा हल्ला अग्रलेखातून चढवण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे.
सायंकाळी सहा वाजता विधिमंडळात अनावरणाचा सोहळा सुरू होणार आहे. मात्र, ठाकरे गटाने याच वेळेत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दोन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे सर्व नेते दक्षिण मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांमुळे विधिमंडळातील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ठाकरे गटाचे काही मोजके पदाधिकारी विधिमंडळातील कार्यक्रमास हजेरी लावतील त्यानंतर मेळाव्यास जाणार असल्याचे समजते.त्यामुळे आता उद्धव ठाकरे तैलचित्राच्या आवरणाला जाणार का हे अजून समजले नाही.
