दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात सहा दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र आता या प्रकरणात धक्कदायक ट्विस्ट आला आहे. कुटुंबातील नातेवाईंकानीच संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून त्यांनी या भयंकर कृत्याची कबुलीही दिली आहे. आरोपीच्या एका भावाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सदर कुटुंबियांनी अंधश्रद्धा आणि करणीच्या माध्यमातून केल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. त्याच रागातून संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 17 जानेवारी रोजी रात्रीची आहे.18 जानेवारी रोजी दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमेच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दोन पुरुष अन्य एक महिला आणि तीन लहान मुलांचे मतृदेह 24 जानेवारीपर्यंत आढळले. या प्रकाराने पुणे ग्रामीण पोलिसही चक्रावून गेले. हा घातपात आहे की आत्महत्या याचा वेगाने तपास सुरु झाला.अखेर यामागील खरे कारण समोर आले आहे.
