आंबेडकरांच्या माध्यमातून मविआतून बाहेर पडण्याचा शिवसेनेचा सेफ प्लॅन

पक्ष फुटला जिवाभावाचे साथीदार सोडून गेल्यावर उद्धव ठाकरे यांना उपरती झाली असून प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून महविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सेफ प्लॅन त्यांनी बनविला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात न घेता ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या वंचितबरोबर युती करण्याचा निर्णय जाहीर केला. वास्तविक महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जाणारे शरद पवार यांच्याविषयी आंबेडकर यांचे काय मत आहे, पवारांना त्यांचा कसा टोकाचा विरोध आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. तरीही ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युतीची कल्पना पवारांना दिली नाही.

ठाकरे यांनी हतबलतेतून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत राहिल्यास आपल्या हक्काच्या मतांमध्ये फूट पडेल अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते यावरून राज्यात वातावरण तयार करत आहेत. ज्या सरंजामी नेत्यांसोबत लढून आपण राजकारण करत आहोत त्यांच्यासोबत बसायचे कसे असे शिवसेना कार्यकर्ते विचारत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका बसू शकतो.

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यांवरून मविआत खदखद सुरू झाली आहे. मात्र त्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली नाही. संजय राऊत यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या फळीतील नेत्यांनी बोलू नये असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना गप्प बसविले. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना नक्की खडसावून सांगितले नाही की राऊत यांची भूमिकाच आमची भूमिका आहे. या सगळ्या घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून मविआतून एक्झिटचा सेफ प्लान बनवलाय की काय?, अशी चर्चा सुरू झाली आहे.