महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदवीर – अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. प्रभाकर मोरे यांनी मनगटावर घड्याळ बांधत राष्ट्रवादीत प्रवेश केला. विनोदी कार्यक्रमात खळखळून हसवणारे अभिनेते अशी त्यांची ओळख सांगितली जाते. ते समाजकार्यात चांगलेच सक्रीय आहेत. काही दिवसांपासून ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आता त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक कलाकारांनी प्रवेश केला आहे. यात मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिका देखील सामील आहेत. जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, आसावरी जोशी अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना सुरेखा कुडची यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
प्रभाकर मोरे यांनी टकाटक, कट्टी-भट्टी, पांघरूण, भाई व्यक्ती की वल्ली, कुटुंब, बाई गो बाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा विनोदी अंदाज सर्वांनाच भावतो. सोबतच त्यांनी छोट्या पडद्यावरदेखील काम केलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे.
