मुंबई : काॅंग्रेस पक्षात बाळासाहेब थाेरात यांची काेंडी झाली असताना नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे कट्टर दुष्मन मानले जाणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. २०१९ साली काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी बाजीप्रभू देशपांडेची भूमिका बजावण्याच्या वल्गना करणारे आता एवढे हतबल का? असा सवाल त्यांनी केला आहे. बाळासाहेब थाेरात यांनी काॅंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यावरून काॅंग्रेसमध्ये वादंग सुरू आहेत.
काॅंग्रेसच्या हायकमांडने अद्याप थाेरात यांच्या पत्रावर निर्णय घेतलेला नाही. यावरून निशाणा साधताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, २०१९ साली काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी बाजीप्रभू देशपांडेची भूमिका बजावण्याच्या वल्गना करणारे आता एवढे हतबल का झाले. भूमिका जाहीर करण्याऐवजी पळ काढणे योग्य होणार नाही. पदवीधर निवडणुकीपासून बाळासाहेब वेगळ्या राजकीय भूमिकेत आहेत का, असा प्रश्न आता निर्माण होतो. थाेरातांच्या साेयीच्या भूमिकेमुळेच काॅंग्रेस पक्षाची काेंडी झाली आहे. नगर जिल्ह्यातील राजकारणात थाेरात आणि विखे-पाटील घराण्यात कट्टर दुष्मनी असल्याचे मानले जाते. हे दाेन्ही नेते काॅंग्रेसमध्ये असतानाही त्यांच्यात विळ्या-भाेपळ्याचे सख्य हाेते. थाेरात यांच्यासह त्यांचा गट भाजपमध्ये येण्याची शक्यता काही माध्यमांमध्ये व्यक्त हाेत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही थाेरात यांना सूचक निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर विखे- पाटील यांचे वक्तव्य आले आहे.
