आव्हाड बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे, परिणाम भोगावे लागतील, संभाजीराजे यांचा इशारा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. आव्हाड बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे, परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील सभेत बोलताना “शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मुघल शासक होते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते”, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. मात्र तरीही आव्हाड आपल्या मतावर ठाम आहेत. यावर संताप व्यक्त करत संभाजीराजे यांनी थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.