नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात हा वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरुन बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देखिल दिली होती.
ऐन कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामाच दिला आहे. प्रभारी एच के पाटील आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या पत्रात राजीनामा दिल्याचा उल्लेख केला आहे.
त्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुरुवातीला बोलणं टाळत माध्यमांच्या प्रश्नाला बगल दिली होती. मात्र, त्यानंतर माध्यमांनी पुनः प्रश्न विचारात नाना पटोले काही अंशी संतापले होते माझ्याकडे अजून राजीनामा आलेला नाही माझ्याशी ते बोलत नाही तुमच्याशी बोलत असतील तर सांगा असं बोलून गेले.आपण काय बोललो हे लक्षात येताच नाना पटोले यांनी बोलणं सावरलं, आणि बाळासाहेब थोरात हे आजारी असल्याने त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही असे म्हणत राजीनाम्यावर भाष्य करणं टाळलं पण पटोले यांच्या बोलण्यातून थोरात विरुद्ध पटोले हा वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे.
