पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शशिकांत वारीशे यांचा खून राजकीय असल्याचे म्हणत एक ट्विट केलं ज्यात याप्रकरणातील संशयित आरोपी चालक पंढरीनाथ आंबेरकर याचा शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांच्यासोबतचा एक फोटो आहे. या फोटोवरून राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री उदय सामंत यांचा या प्रकरणाशी संबंध जोडला आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांनी कुठलातरी पूर्वीचा फोटो दाखवून खाणेरडं राजकारण करणं योग्य नाही, म्हणत राऊतांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
संजय राऊतांना जो फोटो ट्वीट केला आहे तो जुना आहे. हा फोटो नाकारण्याचे काही कारण नाही कारण मी मंत्री होऊन रत्नागिरीला गेलो होते. अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात. तसाच तोही एक फोटो होता. तो फोटो काढला याचा अर्थ मी त्याला पाठबळ दिले असा त्याचा अर्थ होत नाही. कारण त्या व्यक्तीचे राज्यातील अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनतेही ते पाहिलेले आहे. जो कोणी नेता त्याच्यासोबत आहे. तो यामध्ये सामील आहे, असे घाणेरडे राजकारण करणे योग्य नाही असे मला वाटते अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.
रोज सकाळी महाराष्ट्रात वेगळं वातावरण निर्माण करण्यापेक्षा त्यांचे ज्या ज्या नेत्यांबरोबर फोटो आहेत त्याची चौकशी करणार आहेत का? असा सवालही उदय सामंत यांनी संजय राऊतांना केला आहे. ते पुढे म्हणाले की मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणं सोडलं पाहिजे. अशा खाणेरड्या कृत्यांच कोणीही समर्थन करणार नाही. अशी टिका त्यांनी यावेळी केली.
