पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही क्रिकेटमध्ये संधी आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. 2023 मध्ये होणाऱ्या या आयपीएल स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पारपडत आहे. मुंबईत होणाऱ्या या लिलावात तब्बल 409 महिला खेळाडूंचा सहभाग असून महिला प्रीमियर लीगचा पहिलाच लिलाव असल्याने याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
महिला प्रीमियर लीग साठीच्या लिलावातील पहिली बोली टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधानासाठी लागली होती. स्मृती मंधानाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. यावेळी लिलावात जवळपास सर्व संघांनी स्मृती साठी बोली लावली होती. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिला 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. विशेष म्हणजे संघाचे बजेट फक्त 12 कोटी रुपये आहे. त्यातील 3.4 कोटी तिने एकट्या स्मृतीवरच खर्च केले आहेत. आता उरलेल्या पैशातून त्यांना इतर खेळाडूंना खरेदी करावे लागणार आहे.
दरम्यान ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग साठीचा पहिला लिलाव आज मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी, महिला टी20 चॅलेंज स्पर्धा ‘महिला आयपीएल’ म्हणून खेळली गेली होती ज्यामध्ये फक्त तीन महिला संघ होते. बीसीसीआयने ते रद्द केले आणि पाच संघांच्या महिला प्रीमियर लीगची घोषणा केली. लिलावासाठी निवडलेल्या 409 खेळाडूंपैकी 246 भारतीय आहेत. आठ सहयोगी देशांसह 163 खेळाडू परदेशी आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू सर्वाधिक आहेत.
