प्रभू परळी वैद्यनाथानं मला पुनर्जन्म दिला – धनंजय मुंडे

परळीच्या जनतेने मला कधीच मोजून मापून प्रेम दिले नाही, जे दिले ते भरभरून दिले आहे. त्यामुळे मी आजपर्यंत काय करू शकलो, याचा हिशोब देखील मोजणार नाही. आजवर जी कामे केली, कोविड काळात जे मदतकार्य केले, विकासाचे जे स्वप्न घेऊन आपण वाटचाल करतो आहोत त्याचे मोजमाप तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा परळीचे नाव देशात अभिमानाने घेतले जाईल असा विश्वास माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

परळीत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले प्रभू परळी वैद्यनाथानं मला पुनर्जन्म दिलाय. हे सांगण्यासाठी की पुढचे 10 जन्म तुला मिळाले तरी याच मातीत जन्म घ्यायचा आणि इथलीच सेवा करायची आहे. तुला सुट्टी नाही. आज तुमच्या स्वागतात, हे प्रेम, हे आशीर्वाद होते, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. निवडणूक जिंकल्यानंतर, मंत्री पदानंतर स्वागत समजू शकतो. त्यात अपेक्षा, स्वार्थ असतो. पण फक्त आमदार असताना अपघातातून मी वाचलोय. मंत्री नसलो तरी फरक पडत नाही. मी तुमच्यात असावं,ही भावना तुमची दिसली. आज पाहिलं ते जगात कुठच पाहू शकत नाही.

माझ्या भाषणाच्या सुरुवातीला आपल्याच परळीतल्या तिघांचा अपघात झाला. तिन्ही तरुणांचं अंबाजोगाईच्या रुग्णालयात निधन झालं. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. माझी या स्वागताची इच्छा नव्हती. त्या तिघांना मी श्रद्धांजली वाहतो. परळी मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना मला आजवर इथल्या जनतेने अभूतपूर्व प्रेम दिले. जोपर्यंत तुमचे हे प्रेम आहे तोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे. अखेरच्या श्वासापर्यंत माझे जीवन माझ्या मतदारसंघातील जनतेच्या सेवेत समर्पित आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील जनतेप्रति ऋण व्यक्त केले.