लक्ष्मण जगतापांना मी आमदार केले ; अजित पवारांचे धादांत खाेटे वक्तव्य

दिवंगत लक्षमण जगताप यांना मी आमदार केलं असे वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. मात्र राष्ट्रवादीच्या विराेधात जाऊन लक्ष्मण जगताप यांनी हिंमतीने आमदारकी मिळविली असल्याचे म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पवारांवर संताप व्यक्त केला आहे.लक्ष्मण जगताप यांनी 2004 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे उमेदवारी मागितली हाेती. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. बारामती लाेकसभा मतदारसंघातील गणित जुळविण्यासाठी पुरंदरचे चंदुकाका जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे जगताप यांनी बंडखोरी केली स्वत:च्या हिंमतीवर चंदुकाका जगताप यांचा पराभव केला.

2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती. आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला आणि युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला गेला होता. यावेळीही जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे बंडखोरी करत जगताप यांनी चिंचवड मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली व विजय खेचून आणला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ लोकसभा मतदारसंघातून जगताप यांना उमेदवारी नाकारली हाेती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2014ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला. 2017 ची महापालिका निवडणूक आमदार जगताप व आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. या निवडणुकीत अजित पवार यांचे पिंपरी – चिंचवडमधील वर्चस्व लक्ष्मण जगताप यांनी माेडून काढले. हा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला हाेता पुढचा कित्येक काळ ते पिंपरी – चिंचवडमध्ये फिरकलेही नव्हते.