पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित हाेता असा गाैप्यस्फाेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गाेष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला असेही फडणवीस म्हणाले.
टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत फडणवीस बाेलत हाेते. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा सुरु होती. ती चर्चा पुढे जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. याचदरम्यान आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला. राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता. तर दुसरा छोटा होता.
फडणवीस म्हणाले माझ्यासोबत दोन वेळा विश्वासघात झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही.माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला.
