गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. तर अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 5 हजार 177 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता मिळाली आहे. त्यामुळे 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. एकनाथ शिंदेंना पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यावर पहिली बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.