शरद पवारांची खेळी की ठाकरेंच्या समजुतीसाठी नवी गाेळी!

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा यू टर्न घेत पहाटेच्या शपथविधीबाबत दावा केला आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवाल करून ही एक खेळी असल्याचे सुचित केले आहे. मात्र पहाटेच्या शपथविधीनंतर दाेन दिवस ज्या पध्दतीने शरद पवार आमदारांची समजूत घालत हाेते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असल्याने ही खेळी नव्हे तर अजित पवार यांच्याबाबत संशय निर्माण झालेल्या ठाकरे आणि काॅंग्रेसच्या नेत्यांना नवी गाेळी दिली असल्याचेच मानले जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती हाेती असा दावा केला हाेता. यामुळे शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले हाेते. महाराष्ट्राच्या राजकारणातील खंजीराची चर्चा पुन्हा सुरू झाली हाेती. त्यामुळे उध्दव ठाकरे आणि त्यांचा गट याबराेबरच काॅंग्रेसचे नेते प्रचंड उद्विग्न झाले हाेते. विराेधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांच्याबाबत त्यांच्या मनात संशय निर्माण झाला हाेता. अजित पवारांवर भविष्यात विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न महाविकास आघाडीतील नेत्यांकडून विचारला जाऊ लागला हाेता. त्यामुळे अजित पवारांची विश्वासार्हताच पणाला लागली हाेती. त्यामुळे त्यांच्या मदतीला शरद पवार धावून आले आहेत.मुख्य म्हणजे ही जर खेळी असेल तर पहाटेच शपथविधी झाल्यावर दाेन तासांत शरद पवारांची जी धावपळ उडाली ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. अजित पवार यांच्यासाेबत गेलेल्या आमदारांना पुन्हा परत आणताना त्यांच्या नाकी नऊ आले हाेते. एका बाजुला आपले आमदार परत आणायचे आणि दुसऱ्या बाजुला उध्दव ठाकरे आणि काॅंग्रेसच्ये नेत्यांना समजावयाची कसरत शरद पवार करताना महाराष्ट्राने पाहिले हाेते.

मुळात ही खेळी असेल तर पवारांनी उध्दव ठाकरे आणि काॅंग्रेसच्या काही नेत्यांना तरी विश्वासात घेतले असते. परंतु, त्यावेळी त्यांच्या हातून दाेर निसटला हाेता, हे सर्वांनी पाहिले. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवारांसमाेर दुसरा पर्याय राहिला नाही, त्यामुळे त्यांना परत यावे लागले. मग आता याबाबत संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य शरद पवारांनी का केले असा प्रश्न उभा राहताे. याचे कारण म्हणजे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या पवारांचा आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर विश्वास राहिलेले नाही. शरद पवारांनीच भारतीय जनता पक्षाबराेबर घराेबा करण्यास संमती दिली असेल तर आपण आता आपला मार्ग का शाेधू नये अशी भावना नेत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्ष टिकविणे हे त्यांच्यापुढचे लक्ष्य आहे. त्यामुळे आपणच हे घडवून आणले. त्यामागे माेठी खेळी हाेती,असे सांगून स्वत:च्या ताकदीबद्दल पक्षाच्या नेत्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याची प्रयत्न शरद पवार करत आहेत असे बाेलले जात आहे.