जावेद अख्तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते अनेक प्रकरणावर आपले मत देत असतात. नुकतेच जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानात गेले होते आणि त्यादरम्यान त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत अशा शब्दांत ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला खडसावले. लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या ‘फैज उत्सवा’त एका प्रश्नाचे उत्तर देताना अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतामध्ये ज्याप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांचे आपुलकीने स्वागत झाले, तसे पाकिस्तानात झाले नाही याची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली.
भारतीय उपखंडात लोकप्रिय असलेले पाकिस्तानी शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लाहोरमध्ये दरवर्षी फैज उत्सव साजरा केला जातो. यंदा जावेद अख्तर उत्सवात सहभागी झाले होते. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात एका उपस्थिताने ‘पाकिस्तान हा सकारात्मक, मैत्रीपूर्ण भावना बाळगणारा आणि प्रेमळ लोकांचा देश आहे असा संदेश भारतीयांना द्या,’ असे आवाहन अख्तर यांना केले. त्याला उत्तर देताना अख्तर यांनी परखडपणे आपली मते मांडली. आपण एकमेकांना दोष देऊ नये, त्याने प्रश्न सुटणार नाही. वातावरण तणावाचे आहे आणि ते निवळले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
आमच्या भारतामध्ये नुसरत फते अली यांचे मोठे कार्यक्रम झाले. मेहंदी हसन यांच्या मैफिली झाल्या. परंतु तुमच्या देशात मात्र लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम झाला नाही. असे जावेद अख्तर म्हणाले यावर तिथल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना समर्थन दिले.
