खासदार संजय राऊत हे पूर्वीचे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आपुलकी वाटते असे म्हणत ठाणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राऊत यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हाॅस्पीटलमध्ये बुकींग करून बेड राखीव केला. राऊत यांची वक्तव्ये वेडसरपणाची असल्याने त्यांच्या भल्यासाठीच हे केल्याचे महिलांनी म्हटले.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक संजय राऊत यांना मेंटल हाॅस्पीटलमध्ये भरती करण्याचा प्रयत्न केला.यावेळी रुग्णालयात संजय राऊत यांचे दाखल पत्र रुग्णालयातील अधीक्षकांना देण्यात आले, तसेच संजय राऊत यांच्या करिता या रुग्णालयात बेड ही बुक करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे म्हणाल्या सध्या संजय राऊत यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते कशाही प्रकारचे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे ठाणे महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात संजय राऊत यांच्या करिता बेड बुक करण्यात आला. ते आमचे पूर्वीचे नेते असून त्यांच्या संदर्भात आपुलकीची भावना व्यक्त करत आम्ही हा निर्णय घेतला आहे.
