शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे संपादकीय धाेरण भले सरकारविराेधी असेल. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेल्या कामांच्या धडाक्यामुळे ‘सामना’ची चांदी झाली आहे. विशेष म्हणजे ‘सामना’ची मालकी असलेल्या प्रबाेधन माध्यमाचे सर्वेसर्वाे असलेल्या ठाकरे कुटुंबाने याबाबत पूर्ण व्यवहारी भूमिका घेतली असून शिंदे – फडणवीस सरकारच्या कामाचे काैतुक करणाऱ्या जाहिराती प्रसिध्द हाेत आहेत.
राज्याच्या राजकारणात सध्या उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्यातून विस्तवही जात नाही. ‘सामना’मधून दरराेज सरकारविरुध्द भूमिका घेतली जात आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत शिंदे गटाचे आमदार आणि सरकारवर दरराेज जहरी टीका करत आहेत. तरीही ‘सामना’कडून सरकारच्या कामगिरीच्या जाहिराती स्वीकारल्या जात आहेत.
कट्टर शिवसैनिकांना मात्र हा ‘धंदा’ मान्य नाही. उध्दव ठाकरे काय संदेश देतात हे पाहण्यासाठी आम्ही ‘सामना’ वाचत असताे. परंतु, पहिल्याच पानावर दरराेज पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फाेटाे दिसतात, अशी तक्रारही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दैनिकातील जाहिराती व्यवसायाचा भाग असल्याचा मुद्दा काही वेळापुरता मान्य करायचा झाला, तरी ज्या सरकारच्या निर्मितीमुळे शिवसेनेचे होत्याचे नव्हते झाले, त्या सरकारची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे धोरण संजय राऊत यांनी स्वीकारलेच कसे, असा प्रश्नही शिवसैनिक करत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात सर्वाेच्च न्यायालयातील वाद, निवडणूक आयाेगासमाेरील सुनावणी, कसबा, चिंचवड येथील पाेटनिवडणूक या महत्वाच्या घटना आहेत. मात्र, याच काळात दरराेज पहिल्या पानावर सरकारच्या कामगिरीच्या जाहिराती प्रसिध्द केल्या जात आहेत.
शिंदे- फडणवीस सरकारने निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान ही माेहीम सुरू केली आहे. विविध विभागांत केलेल्या कामाची माहिती त्यामध्ये दिली जात आहे. 22 फेब्रुवारी आरोग्य सेवेबाबत निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान, 21 फेब्रुवारी राेजी मोफत एसटी प्रवास वयोवृद्धांसाठी खास 20 फेब्रुवारी राेजी. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या जाहिराती हाेत्या. 19 फेब्रुवारी राेज शिवजयंतीनिमित्त सरकारने दिलेलली जाहिरात हाेती. 18 फेब्रुवारी राेजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाची पूर्ण पान जाहिरात छापलेली हाेती. 16 फेब्रुवारी महाराष्ट्राचे अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर- केंद्रीय अर्थसंकल्पाची जाहिरात छापण्यात आली हाेती. 14 फेब्रुवारी दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग एक ऐतिहासिक पान अशी जाहिरात हाेती. 10 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या जनतेला डबल यांनी सरकारची वंदे भारत ट्रेन्स भेट दिल्याची जाहिरात हाेती. 9 फेब्रुवारी राेजी निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान माेहीमेच्या शुभारंभाची जाहिरात ‘सामना’मध्ये हाेती. 19 जानेवारी मेट्रो लोकार्पणाच्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते कार्यक्रमाची तर 18 जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण अशी जाहिरात हाेती. विश्व मराठी संमेलनाला ‘सामना’मधून विराेध झाला. टीकात्मक बातम्याही हाेत्या. पण 4 जानेवारी विश्व मराठी संमेलनाची पूर्ण पान जाहिरात ‘सामना’मध्ये हाेती.
व्यावसायिक तत्वावर चालणारी वृत्तपत्रेही अनेकदा महत्वाची घडामाेड असेल तर पहिल्या पानावर जाहिरात स्वीकारत नाहीत. मात्र, शिवसेनेसाठीही कितीही महत्वाची घडामाेड असेल तरी ‘सामना’ व्यवस्थापन पहिल्या पानावर ज्याला जाहिरातीच्या भाषेत जॅकेट असे म्हटले जाते, अशा जाहिराती स्वीकारते असे एका जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले. त्यामुळे साहजिकच महत्वाच्या घडामाेडींचे वृत्त असलेले पहिले पान पुढे जाते. ‘सामना’चा घराेघरीपेक्षा जाण्यापेक्षा स्टाॅलवरची विक्री जास्त आहे. वाचक मथळा वाचून पेपर घेतात. परंतु, त्याची व्यवस्थापनाला फिकिर नाही, असे म्हटले जात आहे. उध्दव ठाकरे पैशाच्या बाबत खूपच व्यवहारी असल्याचेही शिवसेनेचेच कार्यकर्ते बाेलून दाखवितात.
