खासदार संजय राऊत यांना त्यांच्या वाचाळपणाची शिक्षा मिळणार असून शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी हाेणार आहे. पक्षाच्या विरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्ष विरोधी पाऊले उचलणे असा ठपका ठेवत ही कारवाई केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव चिन्ह आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. बैठकीत त्रिसदस्यीय शिस्तभंग समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत दादा भुसे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाई आणि सदस्य संजय मोरे असणार आहेत. या कार्यकारणीकडून लवकरच खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करणार असून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येणार आहे. शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. शिंदे ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेल्यानंतर संजय राऊत यांच्याकडून वारंवार त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला जात होता. त्याचबराेबर श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी ठार मारण्याची सुपारी दिल्याचाही आराेप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत असंसदीय शब्दांचा वापर केला. त्यामुळे राऊत यांच्यावर पाेलीसांत तक्रारही देण्यात आली आहे.
