‘भावी मुख्यमंत्री’ पोस्टरवरून सुप्रिया सुळेंचा संताप

राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यावरून पोस्टरबाजी रंगली असल्याचं सध्या दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर खासदार सुप्रिया सुळे यांचं पोस्टर लावण्यात आलं होतं. या पोस्टरवर सुप्रिया सुळे यांचा उल्लेख पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला होता. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचे देखील पोस्टर लावण्यात आले होते. मात्र या पोस्टरवरून सुप्रिया सुळे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टरवरून नराजी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर पोस्टर कोणी लावला? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे पोस्टवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावणे. याचाही कुणाला अधिकार नाही. जर कोणी लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे. माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हा फोटो कुठल्या पक्षाने लावलाय का? कोणत्या व्यक्तीने लावलाय का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे नियमाने चालतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पोस्टरवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांचे पोस्टर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र माझ्या आणि अजितदादांच्या पोस्टरमध्ये साम्य आहे. दोन्ही पोस्टरवर पोस्टर लावणऱ्याचं नाव नाहीये. त्यामुळे हा आमच्या दोघांवर अन्याय आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी कारवाई करावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.