महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्या जाेरदार युक्तीवादाने कलाटणी मिळाली. ठाकरे सरकार काेसळण्याचे कारण उध्दव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामाेरे जाण्याआधीच राजीनामा दिला. त्यामुळे तेथेच विषय संपला, असे साळवे म्हणाले. हरिश साळवे आपल्या युक्तीवादात म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तिथंच विषय संपला आहे. कारण ते विधिमंडळासमोर गेलेच नाहीत. ते सभागृहाला सामोरं गेले असते तर काहीही होऊ शकलं असतं. १६ आमदारांच्या अपात्रतेचाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. २२ आमदारांचा मुद्दा नंतर आला. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही.
राज्यपाल योग्य होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं. त्याला उद्धव ठाकरे नाही म्हटले. त्यानंतर राज्यपालांना पर्याय राहिला नाही. कारण सरकार कोसळलं होतं. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं आणि शिंदेंनी बहुमत सिद्ध केले, असा युक्तीवाद करत शिंदे- फडणवीस सरकार कायदेशिरच असल्यावरही साळवे यांनी शिक्कामाेर्तब केले. हे प्रकरण ‘अकॅडमिक’ झालं आहे असे सांगून साळवे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे. त्या आमदारांनी नंतर विधेयकांवर मतदान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुठलेही प्रश्न सोडवण्याची गरज नाही, केवळ १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अध्यक्षांकडे सोपवावा. ते म्हणाले की नबाम रेबिया प्रकरण मी असं वाचतो की, अध्यक्षांविरोधा अविश्वास प्रस्ताव दाखल झाला असला तरी न्यायालय अध्यक्षांना कधीही थांबवत नाही आणि अध्यक्ष त्यांचं काम करू शकतात.
