चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दारुण पराभव झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हट्टाने दिलेले उमेदवार नाना काटे यांचा तब्बल 36, 770 मतांनी पराभव झाला. तरीही ‘गिरे ताे भी नाक उपर’ असे म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेस भाजपचा नैतिक पराभव झाल्याचे म्हणत आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार राेहित पवार यांनी तर म्हटले आहे की चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवाराने स्वतःऐवजी लोकशाहीचा विचार केला असता तर तिथंही लोकांच्या मनातील निकाल लागला असता, हे आकडेवारीवरून दिसतंय. त्यामुळं चिंचवडमधील विजय हा भाजपचा नैतिक पराभव आहे. सत्ता आणि पैशाच्या बळावर भाजपने लोकशाही खिशात घालू नये, याचाच हा धडा मतदारांनी भाजपला दिलाय.
पण मुळात अजित पवारांनी प्रतिष्ठेची करून ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला हाेता. नाना काटे माेठ्या मतांनी निवडून येणार असे म्हटले जात हाेते. राहुल कलाटे यांना खिजगणीततही धरण्यास तयार नव्हते. त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये काही मते कलाटे यांच्याकडे गेली तरी ही मते केवळ भाजपच्या नव्हे तर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्याही विराेधातील हाेती हे मात्र साेइस्करपणे विसरले जात आहे. अजित पवार यांनी या निवडणुकीत आपण पिंपरी-चिंचवडचा विकास केला, या मुद्यावर मते मागत हाेते. त्यांना मतदारांनी नाकारले आहे.भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी यावरून अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की पिंपरी चिंचवड मध्ये एका महिलेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडला, अजित पवार एक महिना पिंपरी चिंचवडला ठाण मांडून सुद्धा तुला एका महिलेने पाडला महिलेने.
