कसबा विधानसभा पाेटनिवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्याने काॅंग्रेसवाले ढाेल बडवत आहेत. मराठी माध्यमांमध्ये रकानेच्या रकाने भरून याबाबत काैतुक केले जात आहे. मात्र, कालच निकाल लागलेल्या तीन राज्यांतील निवडणुकांतील 180 जागांपैकी काॅंग्रेसला केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे नागालॅंडमध्ये तर शून्य जागा मिळाल्या आहेत.
राहूल गांधी यांच्या भारत जाेडाे यात्रेनंतर देशात काॅंग्रेसला बरे दिवस आल्याचे वातावरण माध्यमांनी तयार केले हाेते. त्यानंतर अदानी प्रकरणावरून राहूल गांधी यांनी आराेप केल्यावर तर भारतीय जनता पक्षाचे काही खरे नाही, असे म्हटले जाऊ लागले. मात्र लाेकांचा काॅंग्रेसवर विश्वास राहिलेला नाही हे तीन राज्यांतील निवडणुकांनी स्पष्ट झाले आहे. नागालॅंडमध्ये काॅंग्रेसला भाेपळाही फाेडता आला नाही. मेघालयात गेल्या वेळी 21 जागा मिळविलेल्या काॅंग्रेसची पाच जागांवर घसरण झाली. त्रिपुरामध्ये एकेकाळचा कट्टर शत्रु असलेल्या कम्युनिस्ट पक्षासाेबत मानहानीकारक आघाडी केल्यानंतर काॅंग्रेसच्या पदरात तीन जागा पडल्या.
देशात सध्या 4033 आमदार आहेत. त्यापैकी काॅंग्रेसचे केवळ 658 आहेत. पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि नागालॅंड यापाच राज्यांमध्ये काॅंग्रेसचा एकही आमदार नाही. काही राज्यांत प्रबळ प्रादेशिक पक्षांशी युती असल्याने काॅंग्रेसचे काही आमदार निवडून आले आहेत.
