बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना वेगवेगळे किस्से सांगत असतात. अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॉग शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांना शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. त्यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली आहे. प्रोजेक्ट के या चित्रपटासाठी बच्चन अनेक दिवसांपासून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत आहेत. शनिवारी दुपारी एका शॉट दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. हैदराबादमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना एअर अॅम्बुलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं. सध्या ते त्यांच्या जलसा या निवासस्थानी आराम करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी बिग बींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हालचाली करताना आणि श्वास घेताना वेदना होत असल्याचं त्यांनी या ब्लॉगमध्ये सांगितलं. त्यामुळे सर्व कामं पुढे ढकलण्यात आली आहेत. सध्या ते जलसा या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कामांसाठी थोडीफार हालचाल करू शकतोय, असंही त्यांनी नमूद केलंय. हे सर्व सांगताना त्यांनी बंगल्याबाहेर भेटीला येणाऱ्या चाहत्यांची खास माफी मागितली आहे.
‘जलसा गेटजवळ माझी वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मी हे सांगू इच्छितो की माझ्यासाठी हे कठीण असेल किंवा थेट बोलायचं झालं तर मला तुमची भेट घेता येणार नाही. त्यामुळे मी बंगल्याबाहेर तुम्हाला भेटायला येऊ शकणार नाही. जलसा बंगल्याबाहेर माझी भेट घेण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. बाकी सगळं ठीक आहे’, असं ते ब्लॉगमध्ये म्हणाले.
