पुणे : कसबा निवडणुकीतील यशाचं सूत्रं काय हे खरंतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे. धंगेकरांना यश मिळेल, असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती. त्याचं मुख्य कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुण्यात पत्रकारांशी बाेलताना शरद पवार म्हणाले, याच्या खोलात जायची गरज नाही. परंतु हा भाजपाचा गड आहे, असं अनेक वर्षे बोललं जातं. दुसरी गोष्ट तिथं अनेक वर्षे गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. बापट सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे नेते आहेत. गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजपा आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ठ संबंध होते. मात्र, पुण्यातील भाजपा सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल, असं आम्हाला वाटत होतं पण शेवटी-शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याबाबत कुजबुज ऐकायला मिळाली. याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे परिणाम होतील, अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होती.
