छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढा – संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात सुरु असलेल्या उपोषणावरून आता राजकीय वातावरण अधिकच पेटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावरून प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे. तर याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण पेटलेले असतानाच शिवसेनेने त्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. त्यामुळे असे लोक उपोषणाच्या नावाखाली संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे काम करत आहे.

आमदार संजय शिरसाट म्हणाले छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाविरोधात लढा दिला. त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर होणे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. काही जणांना याचे वाईट का वाटत आहे? तुम्ही काय औरंगजेबाचे वंशज आहात का?, असा खोचक सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.