कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तूर्तास मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांविरोधात कारवाई करणार नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. ईडीकडून मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मुश्रीफ यांची मुलं नाविद, आबिद आणि साजिद यांच्या अटकपूर्व जामीनाला ईडीकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या मुलांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा, अमित देसाई आणि प्रशांत पाटील बाजू मांडत आहेत. मुलांकडून राजकीय हेतूनं अटकेच्या धमक्यांचा वापर होत असल्याचे म्हटले आहे. ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध करताना त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलं नसल्याचे म्हटले आहे. चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्यास चौकशीवर परिणाम होईल असा दावा ईडीने केला आहे.
दुसरीकडे, मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद देणाऱ्यासह 16 जणांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुरगूड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. सभासदांची कोणतीही संमती न घेता आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद दिल्याप्रकरणी विवेक विनायक कुलकर्णीसह 16 जणांवर मुरगूड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
