हिंदुत्ववादी विचारांशी उद्धव ठाकरेंनी केलेली तडजाेड जनतेने आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबत राहायला तयार नाही. म्हणून ते पक्ष वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. लवकरच दिसेल की त्यांच्याकडे राहिलेले काही एकनाथ शिंदेंकडे जातील काही आमच्याकडे येतील असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे एकाच कारणासाठी दौरे करत आहेत. ते म्हणजे त्यांच्याकडे जे उरलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ नयेत. त्यामुळे ते पक्ष वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठं करण्यासाठी किती पैशांचा गैरवापर होतो. तिन्ही पक्ष किती कार्यकर्ते त्यांच्या सभेला पाठवतात. म्हणजे त्यांच्यामागे किती सहानुभूती येईल. उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे आपलंही जमून जाईल, असं काँग्रेस, राष्ट्रवादीला वाटतं. परंतु सहानुभूतीही नाही आणि त्यांना काही मिळणारही नाही.’’
त्यांनी तिघांनी एकत्र यावं आम्हीही ५१ टक्क्यांची तयारी केली आहे आणि पुढेही आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करताना बावनकुळे म्हणाले मी वारंवार सांगितलं आहे, शरद पवारांनी कसबा निवडणुकीचं पुन्हा एकदा विश्लेषण करावं. कसबा निवडणुकीत धंगेकरांचा विजय आहे, महाविकास आघाडीचा विजय नाही. सुप्त एक सहानुभूती धंगेकरांच्या बाजूने होती. आम्हाला अपेक्षित मतदान मिळाले आहे. मुक्ता टिळक, गिरीश बापट यांना मिळालं होतं, तेवढंच रासने यांना मिळालं आहे. आता थोडी मतांची जी त्यांच्याकडे वाढ झाली ती केवळ उमेदवारामुळे झाली आहे. त्यामुळे त्यांना कसब्याचा प्रयोग जर महाराष्ट्रात करायचा असेल तर थांबवलं कोणी? शेवटी जनमताचा कौल आहे, जनमत जिकडे आहे तिकडे लोक कौल देतील.
