बेळगाव : एकीकडे गेल्या 65 वर्षापासून बेळगावातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत असताना त्यातच लातूरचे आमदार धीरज देशमुख हे बेळगावमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. त्याठिकाणी आपलं भाषण संपल्यानंतर धीरज देशमुखांनी ‘जय बेळगाव, जय कर्नाटक’चा नारा दिला. आणि या नाऱ्यावरुनच सीमाभागातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता किमान मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नये, अशा प्रतिक्रिया सीमाभागातून व्यक्त केल्या जाताहेत.
आमदार धीरज देशमुखांच्या या कृत्यामुळे मात्र बेळगावातीच नव्हे तर समस्त सीमाभागातील मराठी भाषिक वर्ग नाराज झाला आहे. धीरज देशमुखांनी जय कर्नाटकचा नारा देऊन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बेळगाव जिल्ह्यामधील राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख आणि कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांना बोलावलं होतं.
कर्नाटकची निर्मिती झाल्यानंतर तब्बल 865 मराठी भाषिक गावं कर्नाटकमध्ये डांबण्यात आली. ही गावं महाराष्ट्रात सामील व्हावीत यासाठी गेल्या 65 वर्षांपासून बेळगाव, कारवार परिसरातील मराठी भाषकांनी लढा सुरू ठेवला आहे. त्यासाठी त्यांना कित्येकवेळा कानडी पोलिसांचा अत्याचार सहन करावा लागला आहे. असं असतानाही मोठ्या हिमतीने या परिसरातील मराठी बांधवांनी हा लढा कायम ठेवला आहे.
बेळगावातील मराठी भाषकांच्या लढ्याला, खासकरून अलिकडच्या काही काळापासून महाराष्ट्रातून हवा तेवढा पाठिंबा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण बेळगावातील मराठी बांधवांनी हा लढा स्वतःच्या हिमतीवर सुरू ठेवला आहे. अशा वेळी पाठिंबा राहू दे, किमान बेळगावात येऊन आमच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका असं आवाहन करण्यात येतंय.
