प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून बच्चू कडू समर्थकांमध्येही घबराट पसरली आहे. 2017च्या एका प्रकरणात बच्चू कडू यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.यानंतर आता न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर याआधीही तत्कालीन जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2014 मध्ये अचलपूरचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या तक्रारीत दोषी ठरवले होते. त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा साधा कारावास आणि 25,000 रुपये दंड ठोठावला होता. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार न्यायालयाने हा निकाल दिला होता.
