मुंबई : शिवसेना संपली आहे. दुकान बंद झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार नेले. उरलेले पंधराही हाताशी राहणार नाहीत अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. राणे यांनी आज राज्य विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. उद्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बाेलताना राणे म्हणाले, ’एकनाथ शिंदेंनी ४० आमदार नेले, मात्र उद्धव ठाकरे एकाही आमदाराला थांबवू शकले नाहीत. आता शिवसेना संपली आहे, दुकान बंद झालं आहे. आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही त्यांच्या हाताशी राहणार नाहीत.”
उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात यायची त्यांची ताकद नव्हती, ते महाराष्ट्र कसा पिंजून काढणार? ते चार पावलं चालू शकत नाहीत. आता त्यांचं वय नाही. वयात असतानाही ते काही करू शकले नाहीत.’’ असा टोलाही राणे यांनी लगावला. उद्धव ठाकरेंची खेड येथील सभा पूर्वनियोजित होती असा आराेप करत राणे म्हणाले, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीहून लोकांना सभेसाठी आणलं होतं. ही सभा विराट सभा होती, हे दाखवण्यासाठी सभेतील खुर्च्यांमध्ये दोन लोक झोपतील एवढी जागा सोडली होती. सभेला स्थानिक लोक नव्हते. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काहीही केलं नाही, ते केवळ अडीच तास मंत्रालयात गेले. कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होते, त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.
