मनसेचा आज १७ वा वर्धापन दिन; राज ठाकरे काय बोलणार याची चर्चा

मनसेचा आज 17वा वर्धापन दिन सोहळा आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानिमित्ताने मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला, कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक, शिवसेनेचं निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह काढून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या रडारवर आज कोण कोण असणार? याचीही सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने मनसेकडून सभेचे काही टीझर रिलीज करण्यात आले आहेत. त्यातून राज ठाकरे काय बोलणार याची दिशा स्पष्ट होताना दिसत आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर पेजवर हे टीझर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यापूर्वीची आणि मनसे स्थापन करण्यापर्यंतची त्यांची मानसिकता कशी होती, याची थोडक्यात माहिती दिली आहे.

राज्यात मागील काही दिवसापासून अनेक मोठया घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींबाबत काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं. महाराष्ट्रात सध्या हे जे काही चालू आहे त्यावर मी शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे. असं म्हटलं होत. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नक्की काय बोलणार याची चर्चा रंगली आहेत.दरम्यान मागील आठवड्यात पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यावरही राज ठाकरे काय बोलणार, हे पाहणं महत्वाचं आहे.