मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रादेशिक पक्ष असला तरी त्याची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. काही राज्यांत पक्षात धुगधुगीही आहे. मात्र, या पक्षाचे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे नेते असलेले अजित पवार म्हणाले आहेत की ते राष्ट्रीय पातळीवर लक्ष घालत नाहीत. ते लक्ष घालत नाहीत का त्यांना त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे लक्ष घालू देत नाहीत, अशी चर्चा रंगली आहे.
ही चर्चा हाेण्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेसने नागालॅंडमध्ये भाजपप्रणित सरकारला पाठिंबा दिला आहे. विधीमंडळात आणि बाहेरही भाजपविरुध्द आक्रमक हाेणाऱ्या अजित पवार यांना यावर प्रश्न विचारला जाणे स्वाभाविकच. मात्र, नागालॅंडबाबत प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, मी सुरुवातीला राजकारणात आलो तेव्हा १९९१ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झालो. त्यावेळी ४-६ महिन्यासाठी खासदार राहिलो आणि लगेच राज्यात राज्यमंत्री झालो आणि महाराष्ट्रातील काम बघायला लागलो. तेव्हापासून मी महाराष्ट्राशी संबंधितच राहिलो.
मला अनेकदा वेगवेगळी पदं मिळाली. परंतु, ती पदं मिळूनही मी राष्ट्रीय पातळीवर लक्ष देत नाही.
महाराष्ट्रात ज्या भाजपा सरकारने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना तुरुंगात टाकलं त्याच भाजपाबरोबर नागालँडमध्ये राष्ट्रवादीने युती केल्याची टीका होत आहे. याबाबत विचारलं असता अजित पवार यांना उत्तर देणे अवघड झाले. ते म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर गोष्टी शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे इत्यादी नेते बघतात. त्यामुळे नागालँडविषयी मला एवढंच माहिती आहे की, नरेंद्र वर्मा यांना नागालँडमध्ये निरीक्षक म्हणून पाठवलं होतं. त्यांनी मला याबाबत थोडी माहिती दिली. तिथं आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या एवढी मला माहिती आहे. त्यासाठी तेथील सर्वांचं अभिनंदन. याबाबत मी शरद पवारांची माध्यमांमध्ये दिलेली प्रतिक्रिया मी पाहिली.
पक्षाचे सर्वोच्च नेते एखाद्या विषयावर मुद्दे मांडतात त्यानंतर आम्ही त्यावर प्रतिक्रियाच देत नाहीत. शरद पवार पक्षाच्या सर्वोच्च पदावर बसले आहेत. ते पक्षाची भूमिका मांडत असतात. महाराष्ट्राविषयी काही असेल, तर मी त्यावर उत्तर देऊ शकेन. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी नवी दिल्ली येथे झाली हाेती. या कार्यकारिणीमध्ये वक्त्यांमध्ये अजित पवार यांचे नाव नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या भाषणाची मागणी हाेऊ लागली. मात्र, शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर असलेले अजित पवार उठून खाली निघून गेले. नंतर ते राष्ट्रीय कार्यकारिणीतून गायबच झाले. याच कार्यकारिणीत शरद पवार यांची पुढील चार वर्षांसाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली हाेती.
