नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात एमआयएम पक्ष आणि त्याचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर नेहमी भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आराेप केला जाताे. मात्र, नागालॅंड विधानसभेत भाजपप्रणित सरकारला राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्यावरून ओवैसी यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. शरद शादाब असते तर त्यांनाही बी टीम संबोधल असतं, असे त्यांनी म्हटले आहे.
नागालँड निवडणुकीत गरज नसतानाही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपा प्रणित आघाडी सरकारला पाठिंबा दिला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आले. यामुळे त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. मात्र शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळात जोरदार टीकेला सुरवात झाली. यावरून ओवैसी यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जर शरद शादाब असते तर त्यांनाही बी टीम संबोधल असतं. ‘सेक्युलर’ याकरिता अस्पृश्य मानले गेले आहे. ‘मी कधी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला नाही आणि देणार सुद्धा नाही. परंतु दुसऱ्यांदा राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला आहे आणि हे शेवटचे असू शकत नाही.
शरद पवार यांच्या मुस्लिम समाजाच्या व्हाेटबॅंकेवरही त्यांनी हल्ला चढविला आहे. साहेब, त्यांचे मंत्री नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचे समर्थन करतात असा टोला मारला आहे. शरद पवार यांनी नागालँड राज्याच्या व्यापक हिताचा विचार करता मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पक्षाने हा निर्णय स्थानिक पदाधिकारी आणि नवनियुक्त आमदार यांच्या मतावर घेतला.
या निवेदनामध्ये भाजपाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. नेफ्यू रियो यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानवर कॅबिनेटमध्ये भाजपचे ५ तर एनडीपीपीचे ७ मंत्री आहेत. नागालँड निवडणुकीमध्ये रियो यांच्या नेतृत्वात एनडीपीपी भाजपा युतीने विजय मिळवला. रियो यांनी २०१८ मध्ये भाजपाशी आघाडी केली होती. गेल्या निवडणुकीमध्ये या आघाडीने ३० जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये ३७ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपाने या निवडणुकीमध्ये २० जागांवर तर एनडीपीपीने ४० जागांवर उमेदवार उभे केले होते. यामध्ये भाजपाने १२ आणि एनडीपीपीने २५ जागांवर विजय मिळवला.
