‘या’ तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे.कांद्याला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आणले गेले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.

उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. 13 मार्चला या तीन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याच,सोबत 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील असं सांगण्यात येते आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात हाहाकार उडवलाय. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रबीचं पीकही हातचं गेलंय. त्यामुळे शेतकरी आधीच संकटात सापडलाय. त्यातच आता पुन्हा एकदा वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे शेतक-यांनी उर्वरित पीक वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.