पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 118 किमी लांबीच्या बंगळुरु-एक्स्प्रेसवेचं उद्धाटन केलं आहे. निवडणुकांसाठी सज्ज असणाऱ्या कर्नाटकात हा उद्घाटन सोहळा पार पडला. या नव्या महामार्गामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसंच बंगळुरु आणि म्हैसूरमधील अनेक शहरं जोडली जातील. 8480 कोटी खर्च करत हा रस्ता बांधण्यात आला आहे. या रस्त्यामुळे बंगळुरु आणि म्हैसूरमधील अंतर 3 तास 75 मिनिटांनी कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. आज कर्नाटकमधील जनतेने मला जे प्रेम दिले, त्याची व्याजासहित परतफेड करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यग्र आहे. पण मी गरिबांचं जीवनमान उंचावण्यात व्यग्र आहे. लोकांचा विश्वास हीच माझी ढाल आहे. मी कर्नाटकाला सक्षम करण्यात व्यस्त आहे. असं मोदींनी सांगितलं. देशाच्या करोडो माता-भगिनींचे आशीर्वाद मोदींचे सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे. देशातील तरुण या प्रकल्पाबद्दल उत्साहित आहेत,असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
