पुणे : महाराष्ट्र आणि पुण्यात नवीन तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, भविष्यातील तंत्रज्ञान असून महाराष्ट्र स्वीडन बरोबर भागीदारी करण्यास आणि राज्यातील गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे काल रात्री केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे भारताचे ‘पॉवर हाऊस’ आहे. राज्य देशाच्या जीडीपी मध्ये १४ ते १५ टक्के भर घालते. एकूण औद्योगिक उत्पादनाच्या २० टक्के महाराष्ट्रात होते. देशातील २८ टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. पुणे हे नाविन्यता आणि तंत्रज्ञान हब बनले आहे. नवीन तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, भविष्यातील तंत्रज्ञान पुणे आणि महाराष्ट्रात आहे.
हॉटेल रिट्स कार्लटन येथे आयोजित ‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, भारताचे स्वीडनमधील राजदूत तन्मय लाल, स्वीडनचे राजदूत जॅन थेस्लेफ, स्वीडनच्या मुंबई येथील कॉन्सुल जनरल ॲना लेकवॉल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, उद्योजक बाबा कल्याणी, स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सचे कमल बाली आणि वरिष्ठ स्वीडिश व्यावसायिक उपस्थित होते.
जेवरेल म्हणाले, उद्योगाच्या क्षेत्रात स्वीडनचे महाराष्ट्राशी दीर्घकालीन संबंध आहेत. हे संबंध अधिक दृढ होतील आणि नव्या पिढीला त्याचा लाभ होईल. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासासाठी स्वीडनतर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.
उद्योजक बाबा कल्याणी म्हणाले, स्वीडन तंत्रज्ञान, नाविन्यता, कौशल्य आणि डीजीटल तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे आहे, तर भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे. औद्योगिक क्षेत्रातील सहकार्य दोघांसाठी उपयुक्त ठरेल. विशेषत: वाहन उद्योग क्षेत्रात भागीदारीची मोठी संधी आहे.
यावेळी इतरही उद्योजक प्रतिनिधींनी विचार व्यक्त केले. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वीडन इंडिया बिझिनेस कौन्सिल आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात वेस्ट टू एनर्जी, पायाभूत सुविधा आणि हेल्थ केअर क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी स्वीडन इंडिया बिझनेस कौन्सिलचे सदस्य आणि सेरनेके इंटरनॅशनलचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल उपस्थित होते.
भारतामध्ये गुंतवणुकीला मोठे भविष्य – गजेंद्रसिंह शेखावत
भारत ही सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची विकसित देश बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. सर्व क्षेत्रामध्ये जगातील सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आहे. पाण्याच्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आपला असून गेल्या ४ कोटी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे देशात गुंतवणुकीला मोठे भविष्य असून स्वीडनने आणि एसकेएफ कंपनीने सर्वच क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत म्हणाले.
