मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व खासदारांना तातडीने बैठकीला बोलावलं आहे. शिंदे यांनी फक्त खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे बैठकीत काय मोठी रणनीती ठरवली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या बैठकीतील विषय मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकित पक्षाची संघटनात्मक बांधणी, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना आखली जाणार असल्याचे कळते. तसेच मतदार संघातील प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याच बरोबर सुप्रीम कोर्टातील निकाल आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधत आणलेला हक्कभंग राज्यसभेत त्यावरील हरकतीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासदारांवर जबाबदाऱ्या देणार?
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून खासदारांना जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या खासदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सभा घेण्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बैठकीचा तपशील कुणालाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
