अशी केली लूट, तेजस्वी यादवांनी दीडशे कोटी रुपयांचा बंगला केला चार लाख रुपयामध्ये खरेदी

नवी दिल्ली: देशात सक्तवसुली संचलनालय ( ईडी) केलेल्या कारवाईच्या विरोधात विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. मात्र ईडीने ज्यांच्या विरोधात फास आवळला त्यांच्यापैकी अनेकांचे कारनामे आणि त्यांनी केलेली लूट समोर आली आहे. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यांनी दीडशे कोटी रुपयांचा बंगला केवळ चार लाख रुपयामध्ये खरेदी केला असल्याचे तपासात आढळले आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री, राजदचे नेता तेजस्वी यादव यांना ईडीने समन्स बजावले होते. काल (शनिवारी) त्यांची चौकशी होणार होती. पण तेजस्वी यादव यांनी आपण चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान ईडीने चौकशी दरम्यान दिल्लीच्या एका आलिशान परिसरात एक बंगला जप्त केला आहे. हा बंगला एबी एक्सपोर्टस प्राइवेट लिमिटेड या नावाने नोंदणीकृत आहे.या बंगल्याची मालकी ही तेजस्वी यादव आणि कुटुंबियाची असल्याचे उघड झाले आहे. या बंगल्याची किमंत दीडशे कोटी रुपये आहे, मात्र हा तो चार लाख रुपयामध्ये खरेदी केला असल्याचे तपासात आढळले आहे.

या बंगल्यात तेजस्वी यादव हे राहत असतात, त्यांचे कार्यालयही या बंगल्यात आहे. २४ ठिकाणी छापेमारी ईडीनं केली.यात ६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे.

पत्नीच्या आजारपणाचे कारण देत तेजस्वी यादव यांनी चौकशीला हजर राहणार नसल्याचे ईडीला कळविले आहे. त्यांच्या पत्नीची शुक्रवारी बारा तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला होता. तेजस्वी यादव यांची पत्नी गर्भवती आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ईडीने केलेल्या कारवाईत उपमुख्यमंत्री यादव यांच्या घरातून बेकायदा परकीय चलन, दागिने, इलेक्टाँनिक उपकरणे आढळले आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या, मुलगा तेजस्वी यादव आणि कुटुंबियांकडून 1 कोटी रुपयांची रक्कम, दोन किलो सोने, परकीय चलन, सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत.